मुख्यमंत्र्यांवर राणेंनी केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण


औरंगाबाद – माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांवर नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, मला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात काही बोलायचे नाही. पण कोणीही त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे आणि तो विषय शिवसेनेचा आहे. योग्यवेळी त्यांना शिवसैनिकच उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरक्षण टिकावे आणि सुनावणी पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. आज सुनावणी आधीच्या बेंचसमोर होणे सरकारला अपेक्षित नव्हते. संविधानिक बेंचसमोर ती व्हावी, अशी सरकारच्या वतीने विनंती करण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.