बिहारमधील अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली – सोनिया गांधी


नवी दिल्ली – बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार अहंकारात बुडालेले असून या अहंकारी सरकारला बदलण्याची आता वेळ आल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

मी बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला नमन करते. बिहारमधील सत्ता आणि अहंकारात बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटले आहे. बिहारमधील कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरी देखील चिंतेत आहेत. तर तरूण वर्गही निराश असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. आज लोकांना अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीचा त्रास होत आहे. आज बिहारची जनता काँग्रेस महाआघाडीसोबत उभी आहे. बिहारची आज हीच मागणी असल्याचेही त्या म्हणाल्या. दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी आहेत. नोटबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, शेती बंदी आणि रोजगार बंदी केली जात आहे. बिहारमधील जनता याविरोधात एकजूट झाली आहे. आता बदल करण्याची वेळ आहे. आता नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुण, कौशल्य, सामर्थ्य, शक्ती बिहारच्या नागरिकांमध्ये आहे. पण त्यांच्या डोळ्यात बेरोजगारी, स्थलांतर, महागाई आणि उपासमारीसारख्या बाबींमुळे अश्रू आहेत. आपल्याला जे बोलता येत नाही, त्यांना अश्रूंद्वारे वाट करून दिली जात आहे. धोरणे आणि सरकार गुन्ह्यांच्या जोरावर उभे करता येत नाही. बिहार हा भारताचा आरसा आहे आणि एक आशा आहे. भारताचा विश्वास आहे. बिहार हा भारताची शान आणि अभिमानही असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.