‘महापारेषण’मध्ये होणार साडेआठ हजार पदांची ‘महाभरती’

मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत सुमारे साडेआठ हजार तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील ६ हजार ७५० व अभियंता संवर्गातील १ हजार ७६२ पदांची ‘मेगा’ भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या पदभरती प्रस्तावानुसार डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे.

पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन २००५ मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्रधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.

यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण

यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रिकरण करण्याचा घेण्यात आला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे.