‘टेस्ला’चा उत्पादनप्रकल्प उभारण्यासाठी राज्याचा पुढाकार

मुंबई: पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीच्या टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा, यासाठी शासन सकारात्मक असून शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली.

राज्य शासनाने २०१९ मध्ये नवीन औद्योगिक धोरण तयार केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा, असे राज्य शासनाच्यावतीने उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. टेस्ला कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलती दिल्या जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टेस्ला कंपनीने वाहन निर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र राज्यात सुरू करावे, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा राज्य शासन पुरविल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने काही धोरणं निश्चित केली आहेत. येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. टेस्ला कंपनीच्या वतीने रोहन पटेल (ग्लोबल डायरेक्टर, टेस्ला), डॉ.सचिन सेठ हे चर्चेत सहभागी झाले होते. टेस्लासाठी महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.