चीनमधून येणाऱ्या पिवळ्या धुळीला घाबरला किम जोंग उन

फोटो साभार न्यूज सेव्हन

नॉर्थ कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन सध्या चीन मधून येत असलेल्या पिवळ्या धुळीमुळे धास्तावला असून या धुळीतून करोनाचे विषाणू देशात प्रवेश करतील अशी भीती त्याला वाटते आहे. त्यामुळे त्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घराच्या दारे खिडक्या बंद कराव्या असे आदेश जारी केले आहेत. गुरुवारी त्याच्या आदेशाचे नागरिकांनी काटेखोर पालन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजधानी प्यॉगयंग मधील सर्व रस्ते गुरुवारी रिकामे पडले होते.

देशाचे सरकारी वृतपत्र रोडोंग सिन्मून मध्ये चीन मधून येत असलेली पिवळी धूळ धोकादायक तत्वांचा प्रसार करू शकते, कदाचित या धुळीतून करोना विषाणू येण्याची भीती आहे असे जाहीर केले गेले आहे. उत्तर कोरियाने जगभर करोना विषाणूचा प्रसार होत असतानाही देशात एकाही करोना रुग्ण नसल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. मात्र चीन मधून येणारी पिवळी धूळ रहस्यमयी असून यातून करोना देशात येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही धूळ श्वासाबरोबर शरीरात गेली तर श्वसनाला त्रास होतो आणि श्वसनक्रिया बिघडते, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये, खिडक्या बंद ठेवाव्या असे आदेश जारी केले गेले आहेत. अगदी अडचण आली आणि घराबाहेर पडावे लागले तर मास्क लावावा अश्या सुचना दिल्या गेल्या असून टीव्हीवरून सुद्धा पिवळ्या धुळीबाबतच इशारा जारी केल्याची बातमी मिरर ने दिली आहे.