आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार जेईई मेन परीक्षा; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा


नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये पुढील वर्षी होणारी जेईई मेन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) हा निर्णय घेतला आहे. सध्या इंजिनिअरिंगसाठीची जेईई मेन परीक्षा (प्रवेश परीक्षा) इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.


सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण धोरणाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा निर्णय पुढे घेऊन जाईल. इंजिनिअरींग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल, असे ट्विट केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे जेईई मेन परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल. जेईई परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्याने मेरिटमध्ये वाढ होईल. तसेच जे विद्यार्थी भाषेच्या अडचणीमुळे चांगले गुण मिळवू शकत नव्हते, ते आणखी चांगले गुण मिळवण्यात सक्षम होतील असं देखील म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत याचे कारण निदर्शनास आणून दिले आहे की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकनसाठीच्या (पीआयएसए) परीक्षेत उच्च स्थान मिळवणारे देश मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतात. संयुक्त प्रवेश मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि चांगले गुण मिळविण्यात मदत होईल, असे पोखरियाल यांनी म्हटले आहे.