२०२२ उजाडण्याआधी पाच कोरोना प्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस तयार करण्याचा सिरमचा प्रयत्न


पुणे – पाच वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंधक लसीचे १०० कोटी डोस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करणार आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोविशिल्ड (Covishield), कोवोवॅक्स (Covovax), कोविववॅक्स (COVIVAXX), कोवीवॅक (COVI-VAC), एसआआय कोवॅक्स (SII COVAX) या लसींचा यामध्ये समावेश आहे. हे डोस २०२२ वर्ष उजाडण्याआधी तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न असून त्यापरीने त्यांनी तयारीही सुरु केली असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.

आम्ही सुरुवात कोविडशिल्डच्या लसीपासून करणार असून २०२१ च्या सुरुवातीपासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या कोविडशिल्ड लसीची भारतात सुरु आहे. या चाचणीत जवळपास १६०० स्वयंसेवक सहभागी आहेत.

ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेकासोबत मिळून सिरम इन्स्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लस तयार करत आहे. आम्ही आधीच २ ते ३ कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला सात ते आठ कोटींपर्यंत नेऊ शकतो. सध्या आम्ही मर्यादा पाहता जाणुनबुजून कमी लस तयार करत असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

यानंतर कोवोवॅक्स लसीला सिरम इन्स्टिट्यूटकडून प्राधान्य दिले जाऊ शकते. बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या साथीने ही लस तयार केली जात आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मे २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात कोवोवॅक्स लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली. २०२० च्या अखेरपर्यंत ३० हजार स्वयंसेवकांसोबत तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सिरमच्या मदतीने १०० कोटी डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.