‘रॉ’ प्रमुखांची पंतप्रधान के.पी.ओली यांनी भेट घेतल्यामुळे नेपाळमध्ये मोठा वाद


काठमांडू – एका नव्या वादात सतत भारताच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी ओळखले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली सापडले आहेत. अलीकडेच रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंगचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांची के.पी.शर्मा ओली यांनी भेट घेतली. या भेटीची माहिती समोर आल्यानंतर, तीन माजी पंतप्रधान आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी ओली यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ ही भारताची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे.

दुसऱ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना पंतप्रधानांनी भेटणे, हे अयोग्य आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हणत पुष्पा कमाल दहल प्रचंड, झालानाथ खानाल आणि माधव कुमार नेपाळच्या या माजी पंतप्रधानांनी टीका केली आहे. माजी उप पंतप्रधान भीम बहादूर रावल आणि नारायण काजी श्रेष्ठा यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या तसेच काहींनी सोशल मीडियावरुन ओलींवर टीका केली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

दोन तासापेक्षा जास्त वेळ ‘रॉ’ प्रमुखांसोबत चाललेल्या बैठकीत काय चर्चा झाली? त्याची माहिती देण्यास या नेत्यांनी सांगितले आहे. ही बैठक बुधवारी मध्यरात्रीपर्यंत सुरु होती. सामंत कुमार गोयल आणि टीम विशेष विमानाने काठमांडूला गेली. रॉ प्रमुख आणि टीमने २४ तासाच्या या दौऱ्यात विरोधी पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा, माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांची सुद्धा भेट घेतली.

पुढच्या महिन्यात भारताचे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. रॉ प्रमुखांनी त्याआधी नेपाळला भेट दिली. नेपाळने उत्तराखंडमधील भारतीय भागांचा आपल्या नकाशात समावेश केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते. आता हळूहळू भारत-नेपाळ संबंध पूर्ववत होत आहे. नेपाळने मागच्या काही महिन्यात चीनला अनुकूल भूमिका घेतली आणि विनाकारण भारताबरोबरचे संबंध खराब केले.