कार्यकर्त्याला रिव्हॉल्व्हर दाखवत धमकावणाऱ्या भाजप मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल


भोपाळ : देशात सध्या बिहार विधानसभेसोबतच मध्य प्रदेशात होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच हातात रिव्हॉल्व्हर घेऊन कार्यकर्त्यालाच एका भाजप उमेदवाराचा धमकावतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कुणीतरी गुपचूप खासगी चर्चा किंवा बैठकीदरम्यानचा हा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. पण हे मंत्रीपदावरचे भाजप नेते यात सर्रास शिव्या घालत खिशातून बंदूक काढताना दिसत आहेत. आता काँग्रेसने याची दखल घेत भाजपवर थेट निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे जाहीर केले आहे.


हा व्हिडीओ मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री बिसाहूलाल सिंह यांचा असल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल कॅमेऱ्यावर व्हिडीओ शूट केला असल्यामुळे स्पष्ट नाही. पण बिसाहूलाल यामध्ये आपल्याच कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर उगारताना दिसतात. जास्त बोलशील तर गोळी मारेन, अशी थेट धमकी देतानाही यात ऐकू येत आहे. काँग्रेसच्या हाती या व्हिडीओची क्लिप लागल्याने याविरोधात आता निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहे.

सध्या शिवराज सिंह सरकारमध्ये बिसाहूलाल सिंह आहेत. शिवाय पोटनिवडणुकीत ते उभे आहेत. भाजपच्या तिकिटावर ते अनुपपूरच्या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर ते एका कार्यकर्त्याला काही रक्कम आणण्यास सांगताना दिसतात. जास्त बोललास तर गोळ्या घालीन, अशी धमकीची भाषाही ऐकू येते. अद्याप व्हिडीओची शहानिशा झाली नसली, तरी हा व्हिडीओ काँग्रेसकडून शेअर करण्यात येत आहे.