खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यामागे पवारांची राजकीय गणिते असू शकतात – संजय राऊत


मुंबई – उद्या दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांना प्रवेश देत भाजपला शरद पवार यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. दरम्यान खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणिते असू शकतात, असा अंदाज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तवला आहे. राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच दिला असेल असेही ते म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती भूमिका मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. राजकारणातील सर्वात ताकदवान नेते म्हणून शरद पवार यांचा नावलौकिक असून ते राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत. ते असे उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांचे महत्त्व त्यांना पटले असेल. शरद पवारांचे आधीचे वक्तव्य मी ऐकले, ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नसल्याचे सांगितले. जर एवढा कठोर निर्णय़ शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपमधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणिते असू शकतात.