कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे अजित पवारांनी घेतला क्वारंटाइन होण्याचा निर्णय


मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात जास्त खबरदारी घेताना पाहिले आहे. पण, आता कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे अजित पवार यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. तातडीने अजित पवार यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. पण त्यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. पण थोडा ताप आणि थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रम थांबविले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीतही आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला होता. अजित पवार ज्या ठिकाणी जात होते, त्यावेळी ते स्वत: आपल्यासोबत सॅनिटायझर बाळगत होते. ते इतरांनीही खबरदारी घेण्याचा सल्ला देत होते. दोन दिवसांपासून अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचीही चाचणीही करण्यात आली पण रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.

अजित पवार हे कोरोना सारखी काही लक्षणे आढळत असल्याने पुढील काही दिवस क्वारंटाईन राहणार आहे. ताप आणि थंडी जाणवू लागल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम हे रद्द केले आहे. अजित पवार बुधवारी मंत्रालयात सुद्धा अनुपस्थितीत होते. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.