Video Viral; तेजस्वी यादव यांच्यावर प्रचारसभेत फेकण्यात आल्या चपला


नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसात पार पडणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता उठू लागला आहे. रॅली आणि प्रचारसभांमधून नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निवडणूक प्रचारा दरम्यान चप्पल फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तेजस्वी यादव बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने तेजस्वी यादव यांच्या या सभेत त्यांच्या दिशेने चप्पल फेकून मारली. व्यासपीठावर आपल्या कार्यकर्त्यांशी तेजस्वी यादव बोलत होते. एकाने त्याचवेळी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने गेली. त्यांना ती लागली नाही. पण यानंतर सभेत एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तेजस्वी यादव यांच्या बाजूने एक चप्पल निघून जाते तर दुसरी चप्पल त्यांना लागताना दिसत आहे. प्रचारसभेसाठी तेजस्वी यादव हजर राहिले होते. व्यासपीठावर तेजस्वी पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर एका दिव्यांग व्यक्तीने चप्पल भिरकावली. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला सभेतून बाहेर काढले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र प्रचारासाठी गेलेल्या एका मंत्र्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी मते मागण्यासाठी आलेल्या बिहारच्या कामगार संसाधन मंत्र्याला घेरल्याची घटना समोर आली आहे. मंत्र्याच्या नावाच्या मुर्दाबादच्या घोषणा देत ग्रामस्थांनी निषेध सुरू केला. तसेच मंत्र्यावर जमलेल्या लोकांनी शेण फेकायला सुरुवात केली आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे. ग्रामस्थांनी केलेला विरोध आणि व्यक्त केलेला संताप पाहून मंत्री आल्या पावली पळून गेले आहेत. मंत्र्यांवर शेण फेकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. विजयकुमार सिन्हा हे हलसीच्या तरहारी गावात मते मागण्यासाठी गेले होते. पण गावात प्रवेश करताच सिन्हा यांच्या विरोधात ग्रामस्थांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.