उद्यापर्यंत होईल शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय : उद्धव ठाकरे


उस्मानाबाद : राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे संकटात असून अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला घरे वाहून गेली ही माहिती घेतली होती. कमीत कमी जीवितहानी पावसादरम्यान व्हावी यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. शेतकऱ्यांच्या मदतीचे काम मुंबईत सुरू असून मदतीचा आज उद्यापर्यंत निर्णय होईल. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते करू, मी सवंग लोकप्रियता व टाळ्यांसाठी घोषणा करणारा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. नुकसान व रक्कम याचा आढावा सुरू असून जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्यामुळे फडणवीस यांच्या टिकेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. सरकार म्हणून जे करू ते ठोस करू, यावर मुंबईत काम सुरू आहे. दसरा दिवाळी सण येत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पैशाचे सोंग आणता येत नाही, जीएसटीचे पैसे आले नाहीत, हक्काचे पैसे केंद्राकडून आले नाहीत. कर्ज उभे करायचे का यावर काम सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोव्हिड काळात राज्याने जम्बो हॉस्पिटल, कोविड लॅब तात्काळ सुरू केले. इतर राज्यांपेक्षा चागले काम कोरोन संकटात महाराष्ट्राने केले आहे. आता कोव्हिड संकट व जीएसटीचा परतावा न मिळाल्याने मदतीचा निर्णय रखडला. राज्याचे अर्थचक्र मोडून टाकणारे कोरोना संकट असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.