महिलांमध्ये गुडगेदुखीचे प्रमाण अधिक

पुणे – बदलत्या जीवनशैलीचे जे अनेक तोटे आज माणसाला सोसावे लागत आहेत त्यात गुडघेदुखी सर्वात आघाडीवर आहे. चाळीस वर्षांवरील नागरिकांत गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या महिला व पुरूषांचे प्रमाण जवळजवळ २५ टक्के आहे. त्यातही शहरापेक्षा गावाकडील लोकांत व पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये गुडघेदुखी अधिक प्रमाणात आढळते आहे असे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुण्यातील एका खासगी संस्थेने या सर्वेक्षणाचा अहवाल गेली दीड वर्षेतील नोंदी घेऊन तयार केला असून तो आजपासून आग्रा येथे सुरू होत असलेल्या इंडियन आर्थोपेडिक असोसिएशनच्या ५८ व्या वार्षिक संमेलनात सादर केला जाणार आहे.

या सर्वेक्षणासांठी आग्रा, पुणे, डेहराडून, कोलकाता, बंगलोर, अशा विविध शहरातून आणि ग्रामीण भागातून सुमारे ५ हजार नागरिकांना प्रश्न विचारले गेले. भारतीय लोकांमध्ये ऑस्टीओ आर्थ्रायटीसचे प्रमाण गंभीररित्या वाढते आहे आणि त्यामागची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर चर्चा करण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले असे असोसिएशनचे डॉ. पाल यांनी सांगितले.

सर्वेक्षणात असे दिसून आले की पुरूषांच्या तुलनेत गुडघेदुखीने महिला अधिक संख्येने त्रस्त आहेत तसेच शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना या व्याधीचा अधिक त्रास सोसावा लागत आहे.चाळीशी ओलांडलेल्या पुरूषात हे प्रमाण २७.९ टक्के आहे तर महिलांत हे प्रमाण २८.८ टक्के इतके आहे. हा अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणार आहे. शहरी भागात मेट्रो सिटीत गुडघेदुखीने हैराण असलेल्यांचे प्रमाण २७.२ टकके, छोट्या शहरांत २७.६ टकके तर गावांत हेच प्रमाण २८ टक्के इतके आहे. देशात या प्रकारचे सर्वेक्षण प्रथमच केले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment