बदामाचा उपयोग

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये पाश्‍चात्य जगात आधुनिक वैद्यक शास्त्रावर प्रयोग करणार्‍या शास्त्रज्ञांनी सुक्या मेव्यावर बरेच प्रयोग करायला सुरुवात केली आहे. त्यातून त्यांना खूप नवे शोध लागत आहेत. पूर्वी भारतामध्ये काही आयुर्वेदाचार्य बदाम खाण्याचा सल्ला देत असत. बदाम खाण्याची एक स्वतंत्र ट्रिटमेंट होती. पहिल्या दिवशी एक बदाम, दुसर्‍या दिवशी दोन बदाम, तिसर्‍या दिवशी तीन बदाम असे पंचवीस बदाम खात जायचे आणि पुन्हा पंचवीस पासून चोवीस, तेवीस, बावीस असे करत एक पर्यंत यायचे. असे पन्नास दिवस बदाम खाण्याची एक ट्रिटमेंट काही आयुर्वेदाचार्य देत असतात. काही विशिष्ट विकारांसाठी ती आहे. आता आधुनिक वैद्यक शास्त्रालाही बदामाचे महत्व कळले आहे.

जुन्या काळात बदाम टॉनिक म्हणून वापरला जात होता. डिंकाच्या लाडूत बदाम घातले जातात, शिर्‍यामध्ये बदाम घालण्याची पद्धत आहे आणि बाळगुटीमध्ये सुद्धा बदामाला मोठे महत्व आहे. आता शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, बदामामध्ये प्रथिने, तंतूमय पदार्थ, कॅल्शियम आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. बदाम स्निग्ध असतात. काजू, शेंगदाणे हेही स्निग्ध असतात. त्यामुळे डॉक्टरमंडळी बर्‍याचवेळा हृदय विकार असणार्‍यांना अशा सुक्या मेव्यापासून सावध राहण्याचा इशारा देत असतात. श्रीमंत लोकांना काजू, बदाम खाल्ल्यामुळे हृदय विकार होतो, वजन वाढते असे म्हटले जाते ते काही चुकीचे नाही. परंतु बदाम त्याला अपवाद आहे.

बदामामध्ये असलेले ङ्गॅटस् हृदयाला उपकारक असतात. ते ङ्गॅटस् शरीरातल्या बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात, असा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढला आहे. बदामामध्ये ई जीवनसत्व जास्त असल्यामुळे ते रोगप्रतिकारक क्षमता बाळगून असतात. मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार या आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता बदामामध्ये असते. विशेषत: बदामात असलेले तंतूमय पदार्थ अधिक रोगप्रतिकारक असतात. बदामातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा परिणाम स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये अधिक जाणवतो. शरीरातल्या पेशींच्या क्षीण होण्याच्या प्रक्रियेवर बदाम प्रतिबंध घालतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment