Viral : नितेश राणेंचा सरकारी अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा


सिंधुदुर्ग : सध्या सोशल मीडियात भाजप आमदार नितेश राणे हे सरकारी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का? त्याला बघण्यासाठी जात आहात, असे म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना झापले. त्याचबरोबर लिंगडाळ गावात तासाभरात न आल्यास मिरवणूक काढण्याचा धमकीवजा इशाराही फोनवरुन त्यांनी एका अधिकाऱ्याला दिला.

काल देवगड-लिंगडाळ येथे शेतीच्या नुकसानीची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. पण त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतीचा पालकमंत्री उदय सामंत यांचाही पाहणी दौरा असल्याने पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सर्व अधिकारी सहभागी झाले होते. तलाठी, कृषी अधिकारी नितेश राणेंच्या दौऱ्यासाठी न आल्याने त्यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापले. सध्या सिंधुदुर्गात त्यांच्या धमकीचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

मी लिंगडाळ गावात आलो आहे, येथे तुम्ही अद्याप पंचनामे करायला पोहोचले नाही आहात. तुम्हाला काय हजामत करायला ठेवले आहे काय ? कसले पंचनामे सुरु आहेत? मी येथे लिंगडाळ गावात आहे. येथे तुमचा एक अधिकारी पोहोचलेला नाही. पुढच्या एक तासात तुमचा अधिकारी पोहोचला नाही तर, मी तिथे येतो तुम्हाला घ्यायला. लिंगडाळला एक तासामध्ये ये आणि मला फोन कर. तू येथे आला नाहीस ना, आणतो बघ तुझी मिरवणूक कशी येथे.. उठ तिथून पहिला.. आणि लिंगडाळला ये आणि फोन कर मला.. नाटके तुमच्या लोकांची, असे नितेश राणे फोनवर बोलताना या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐकायला येते

नितेश राणेंनी दुसऱ्या व्हिडीओमध्ये उदय सामंतांच्या दौऱ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना झापल्याचे दिसते. अधिकाऱ्यांना खाली पाठव.. उगाच तिथे पालकमंत्र्यांचे लाड नको.. तुम्ही एक जण राहू शकता, बाकीच्या लोकांना पाठवा ना.. तो काय अमिताभ बच्चन आहे का त्याला बघण्यासाठी जात आहात सगळे.. कोण नाही येथे.. अधिकाऱ्यांशी बोलून घ्या पंचनामे करायला लावा.. बिचाऱ्या लोकांची हालत होत असल्याचे फोनवर नितेश राणे बोलत असल्याचे ऐकू येते.