
मुंबई – परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार उडवून देत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. शेतमालाचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरात काही ठिकाणी मळणीसाठी जमा केलेला शेतमाल वाहून गेल्यामुळे आर्थिक समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. याच मुद्यावरून मोदी सरकारला जबाबदारीची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाणीव करून दिली आहे.
रोहित पवारांनी मोदी सरकारला करुन दिली जबाबदारीची आठवण
दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…
आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच,
पणकेंद्रानेही #GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत.
अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 20, 2020
राज्यात सध्या परतीच्या पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा तापला आहे. दरम्यान विरोधकांकडून राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. तर राज्याची देणी केंद्राने द्यावी, असे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. आता रोहित पवार यांनी मदतीच्या या वादात उडी घेतली असून, त्यांनी केंद्राला मदतीवरून खडेबोल सुनावले आहेत. या संदर्भात एक ट्विट करत रोहित पवार यांनी दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच, पण केंद्रानेही जीएसटीचे राज्याचे थकीत २८ हजार कोटी रूपये तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी, असे म्हटले आहे.
