बॉलीवूडच्या मुन्नाभाईची कॅन्सरवर मात


बॉलीवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदवार्ता आहे. कारण जीवघेण्या कॅन्सरवर संजय दत्तने मात केली असून या वृत्ताला संजय दत्तचे जवळचे मित्र आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट राज बन्सल यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, 61 वर्षीय संजूचे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) सोमवारी स्कॅन झाले असून त्या रिपोर्टमध्ये संजू आता कर्करोगमुक्त झाल्याचे समोर आले आहे. या आजारात पीईटी स्कॅन ही सर्वात ऑथेंटिक तपासणी समजली जाते. कर्करोगाने पीडित व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशींची स्थिती काय आहे हे त्यातून समजते. संजय दत्त आणि मान्यता दत्त संध्याकाळपर्यंत अधिकृत माहितीही शेअर करू शकतात.

याबाबत माहिती देताना रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, मेटाबोलिक दर वास्तविक कर्करोगाच्या पेशींमध्ये कर्करोग नसलेल्या पेशींपेक्षा जास्त असतो. कर्करोगाच्या पेशी या उच्च स्तरावरील रासायनिक क्रियेमुळे पीईटी स्कॅनवर चमकणा-या डागासारख्या दिसतात. यामुळे पीईटी स्कॅन कर्करोगाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात कर्करोग किती पसरला आहे, हेदेखील यातून कळू शकते.

संजय दत्तने अलीकडेच आपल्या आजाराविषयी मन मोकळे केले होते. अलीकडेच संजूचे दोन व्हिडिओ सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकीम यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले होते. संजय दत्तने एका व्हिडिओमध्ये सर्वांना अलीमची ओळख करुन देत आपल्या कपाळाची खुण दाखवली होती. सोबतच तो म्हणाला होता की, जर तुम्ही हे पाहिले तर ही माझ्या आयुष्यातील नवीन खूण आहे. परंतु मी त्याचा पराभव करेन आणि लवकरच कर्करोगातून मुक्त होईल, असे म्हटले होते.