सिरम आणि भारत बायोटेकवर नवी जवाबदारी, करावा लागणार दुसऱ्या पद्धतीचा अवलंब


कोरोना प्रतिबंधक लसीचे संशोधन जगभरात अहोरात्र सुरु आहे. पण या लसी बहुतांश दोन डोसच्या असून त्या इंजेक्शन पद्धतीने देण्यात येतील. पण त्यातही आता लस देण्याच्या पारंपारिक पद्धतीशिवाय अन्य मार्गाने लसीचा एक डोसही पुरेसा ठरेल, अशा पद्धतीची लस विकसित करण्यावरही संशोधन सुरु झाले आहे.

या नव्या पद्धतीने भारतातही विकसित करण्यात आलेल्या लसीची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. त्यानुसार लवकरच नाकावाटे द्यायच्या लसीची मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन कंपन्या सुरु करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक वैद्यकीय नियमन करणाऱ्या संस्थांकडून परवानगी मिळाल्यानंतर लवकरच नाकावाटे द्यायच्या लसीच्या चाचण्या सुरु करतील, अशी माहिती सरकारने दिली.

सध्या नाकावाटे द्यायाच्या कोरोना लसीची मानवी चाचणी भारतात अद्याप सुरु झालेली नाही. भारत बायोटेक आयसीएमआरसोबत मिळून कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस विकसित करत आहे. भारत बायोटेकने नाकावाटे द्यायची कोरोना लस विकसित करण्यासाठी वॉशिंग्टन विद्यापीठ आणि सेंट लुइस विद्यापीठासोबत करार केला आहे.

भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनसोबत करार केला आहे. कंपनी या करारातंर्गत Sars-CoV-2 विरोधात इन्ट्रानेसल लसीची निर्मिती आणि चाचणी करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

लवकरच नाकावाटे द्यायच्या लसीची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक सुरु करतील, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. हजारो स्वयंसेवक लेट स्टेज ट्रायलमध्ये असतात, काही वेळा ही संख्या ३० ते ४० हजारच्या घरात असते असे हर्ष वर्धन म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या फेज तीनमध्ये असलेल्या सर्व लसी इंजेक्शन पद्धतीने दिल्या जातात. भारतातील औषध नियंत्रकांनी पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर डॉ. रेड्डी लॅबला शनिवारी ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे.