पुजाऱ्याने दिली स्वतः चीच सुपारी; राजकीय डाव असल्याचा पोलिसांचा दावा


लखनौ: राजकीय वैमनस्यातून माजी सरपंचाला अडकविण्यासाठी राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्याने मारेकऱ्यांना स्वतः चीच सुपारी दिल्याचा दावा गोंडा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

राम जानकी मंदिराचा पुजारी अतुल त्रिपाठी उर्फ सम्राट दास याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून राज्य सरकार आणि पोलीस यांच्यावर कठोर टीका होत आहे. अयोध्येतील संत, महंत यांनी घटनास्थळी तळ ठोकून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांच्या नव्या दाव्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.

गावचे सरपंच विनय सिंह आणि माजी सरपंच अमर सिंह यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य आसून अमर सिंह यांना अडकवण्यासाठी मंदिराचा मुख्य पुजारी सीताराम दास, पुजारी सम्राट दास, सरपंच विनय सिंह यांनी संगनमत करून व्यावसायिक मारेकऱ्यांना गोळीबार करण्याची सुपारी दिली. या गोळीबारात सम्राट दास यांच्या जीवाला धोका होणार नाही याची तंबी देण्यात आली. पुजाऱ्याला किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रुग्णालयातून सोडल्यावर सम्राट दास याला अटक करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितीन बन्सल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या वादग्रस्त प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची ५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत ७ जणांना गजाआड करण्यात आले असून ३ गावठी कट्टे, ७ काडतुसे आणि मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी फिर्यादी असलेल्या मुख्य पुजाऱलाच आरोपी करून त्याला ही अटक करण्यात आली आहे.