चीनचा धक्कादायक दावा; फ्रीजमधील पॅकिंग पदार्थांवर आढळले कोरोनाचे जिवंत विषाणू


नवी दिल्ली – संपूर्ण जगभरावर कोरोनाचे संकट ओढावले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देशात युद्धपातळीवर लस निर्मितीचे काम सुरू आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीवर अनेक देशात काम सुरु असतानाच आता कोरोनाचे स्वरूप बदलताना दिसत आहे. कोरोनासंदर्भात नवीन आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाचे जिवंत विषाणू फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या पॅकिंगवर आढळून आले आहेत.

हे निरीक्षण चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने नोंदवले असून कोरोनाचे जिवंत व्हायरस फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर असल्याचा दावा चीनने केला आहे. हे निरीक्षण चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात आढळून आले आहे.

कोरोनाचे जिवंत विषाणू थंड करण्यात आलेल्या पदार्थांना असलेल्या आवरणावर आढळून आले आहेत. कोरोनाचा या पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून संसर्ग होण्याचा धोका असल्याचे चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने म्हटले आहे. या महिन्यात अनेक कोरोना रुग्ण किंगदाओ शहरात आढळून आले. यात परदेशातून आलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रुग्णालयाशी संपर्क येणार रुग्ण अधिक आहेत.

चीनकडून परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे कोरोना वाढीचा धोका अधिक असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. चीनकडून याचा गेल्या काही महिन्यांपासून पुनरुच्चार करण्यात आला आहे. अशा पदार्थांच्या आवरणांची यापूर्वी काही देशांमध्ये तपासणी करण्यात आली होती. ज्यात कोरोना विषाणू असल्याचे आढळून आल्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधील चीनने बंदी घातली होती.

कोरोना विषाणू थंड अन्न पदार्थांच्या आवरणावर आढळून आले असल्याचा दावा चीनने केला आहे. पण ही बाब जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावलेली आहे. कोरोनाचा प्रसार अन्न पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.