या महिन्यापर्यंत मिळू शकते ‘सिरम’ची कोरोना प्रतिबंधक लस


पुणे – कोरोना प्रतिबंधक लस भारताला मार्च 2021 पर्यंत मिळू शकते, अशी माहिती सिरम इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी दिली असून ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या लसींची ‘सिरम’कडून देशात अनेक ठिकाणी चाचणी सुरू आहे. 74 लाखांपर्यंत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. तर दीड टक्क्यापर्यंत मृत्यूदर खाली आला असला तरी रोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सिरम इन्स्टिटय़ूटचे डॉ. सुरेश जाधव यांनी एका इंग्रजी दैनिकाला या पार्श्वभुमीवर दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक आहे.

कोरोना प्रतिबंधक लस सर्व काही योग्य दिशेने राहिले तर मार्च 2021 पर्यंत मिळू शकते. सध्या देशात दोन कोरोना लसींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे, तर एका लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. असे जाधव म्हणाले. दरम्यान कोणत्याही लसीच्या चाचणीमध्ये चढउतार येत असतात. पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कोरोनावरील लस तयार होईल. जानेवारी 2021 पर्यंत विविध लसींच्या अंतिम चाचण्यांचे अहवाल पाहून आम्ही निर्णय घेवू, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

डॉ. सुरेश जाधव इंडिया व्हॅक्सिन अव्हेलॅबिलीटी ई समीटमध्ये बोलताना म्हणाले, 70 ते 80 कोटी डोस दरवर्षी ‘सिरम’ बनवू शकते. डिसेंबर 2020 पर्यंत ‘सिरम’कडून 6 ते 7 कोटी कोरोना लसीचे डोस तयार होतील. पण सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात येतील. त्यासाठी 2021 उजडेल. सरकारने परवानगी दिल्यास आणखी डोस तयार करू. देशातील 55 टक्के लोकसंख्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र, धोका लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी ही लस दिली पाहिजे, असे जाधव म्हणाले.