राज्य सरकारने सुडापोटी घातला फडणवीसांच्या चौकशीचा घाट – रामदास आठवले


मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याचा घाट महाविकास आघाडीने सुडापोटी घातला असून चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट राज्य सरकारने सुडापोटी घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर त्यावेळी संबंधित मंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा, सुडाचे राजकारण मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करु नये.

दरम्यान आमची धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आंदोलनही केले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली उद्धव ठाकरे आहेत. आज फडणवीस सरकारमध्ये शिवसेना असती तर ही वेळ नसती आली. कोणाच्याही दबावाला शिवसेनेने बळी पडू नये आणि त्यांनी सर्व धार्मिक स्थळे उघडावीत. गरज पडली तर पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळे उघडावीत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून राज्य सरकारने 15 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी यावेळी आठवले यांनी मांडली. ते पुढे म्हणाले की, सध्या कृषी विधेयकास काँग्रेस विरोध करत आहे. व्हर्च्युअल रॅली काढत आहेत, परंतु राज्यातील पिकांच्या नुकसान भरपाईला तयार नाही. तसेच हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते, मग अद्याप सातबारा कोरा का केला नाही?

दरम्यान आठवले बॉलिवूड प्रकरणावर बोलताना म्हणाले की, फिल्मसिटी मुंबईबाहेर नेण्यास आमचा विरोध आहे आणि राहील. फिल्मसिटी मुंबईचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथे अमिताभ यांच्यासारखे कलाकार आले आणि बिग बी झाले. फिल्मसिटी मुंबईतच राहायला हवी. तसेच ड्रग्स घेणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीत काम देऊ नये, अशी आमची मागणी आहे. आठवले यांनी पुन्हा एकदा कंगना प्रकरणावर भाष्य केले. आठवले म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत माझे आणि कंगनाचे एकमत असेलच असे नाही. मुंबईत येण्यापासून तिला पायबंद घातल्यामुळेच आम्ही तिला पाठिंबा दिला होता. मुंबईला बदनाम करण्याची ताकद कुणातच नाही.