डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता


वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांनी हे वक्तव्य मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजच्या एक कार्यक्रमात केले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. पण यातून ते सुखरुप बाहेर आले. व्हाइट हाउसमध्ये २६ सप्टेंबरला एक कार्यक्रम झाला होता. ट्रम्प यांना कोरोना या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे झाल्याचे म्हटले जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असे असतानाही आता मास्क घालणाऱ्यांबाबत ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यासंदर्भातील वृत्त जनसत्ताने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी २६ सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच पॉझिटिव्ह आली होती. या कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. याबाबत जेव्हा त्यांना मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त होतात. अद्याप कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही. सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. याआधीही कोरोनाबाबत त्यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. हा चायनीज व्हायरस असल्याचेही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केले होते. आता सतत मास्क घालणारे लोक कोरोनाबाधित असतात, असे खळबळ उडवून देणारे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.