मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने ठोठावली तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

महाराष्ट्र सरकार मधील महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कामावर असलेल्या पोलिसाला थप्पड मारल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. या प्रकरणात यशोमती ठाकूर याना अटक झाली तर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल असे समजते. ठाकूर यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आठ वर्षापूर्वी ठाकूर यांनी अमरावती अंबा मंदिराजवळ ड्युटीवर असलेल्या उल्हास रोराळे या पोलिसाला थप्पड मारली होती. त्यांच्या कारचालकाने आणि अन्य दोन समर्थकांनी सुद्धा या पोलिसाला मारहाण केली होती. त्याविरुध्द खटला दाखल केला गेला होता त्याचा निकाल अमरावती न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खोटी साक्ष देणाऱ्या पोलिसाला सुद्धा न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

या बाबत बोलताना ठाकूर म्हणाल्या, मी स्वतः वकील आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करते. आठ वर्षानंतर हा निकाल आला आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. ठाकूर तिसऱ्या वेळी आमदार म्हणून अमरावतीतून निवडून आल्या असून त्या अमरावतीच्या पालकमंत्री सुद्धा आहेत. ठाकूर यांनी यावेळी भाजपवर आरोप करताना भाजप महिला राजकारण्याचे करियर संपविण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हटले आहे.