पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे पुणेकरांचे हाल – सुप्रिया सुळे


पुणे – काल दुपारपासून पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यानंतर आता पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन राजकारण सुरु झाले असून बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरले आहे.

कात्रज येथील संरक्षक भिंत दोन वर्षापुर्वी कोसळली होती. त्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना करण्यात आल्या नसल्यामुळे आजच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला भाजपच जबाबदार असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्या मार्गदर्शन घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज परिसरातील विश्वकर्मा नगर येथे पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी नगरसेवक, पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात अतिवृष्टीमुळे कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महापौर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्यावर उपयोजना करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात वेळोवेळी मांडली. पण महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष केले. पुण्यातील नागरिकांचे सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळेच मोठे नुकसान झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत केले जातील असे आश्वासन सुळे यांनी दिले.