लोणावळा, खंडाळ्यातील पर्यटनबंदी मागे; स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये आनंद


पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून पर्यटनबंदी असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरासह पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी पर्यटनबंदी मागे घेतल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक मोठय़ा संख्येने लोणावळा आणि खंडाळ्याच्या परिसरासह पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, मुळशी, मावळ परिसरात वर्षांविहारासाठी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मावळ तालुक्यात असलेले गड, किल्ले, लेण्या तसेच पवना धरणाच्या परिसरातही मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देतात. बंदी उठविल्याने पर्यटकांना हे परिसर आता खुले झाले आहेत.

पर्यटनबंदी मागे घेण्यात यावी, यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पर्यटन व्यवसायावर मावळ तालुक्यातील ग्रामीण भाग अवलंबून आहे. पर्यटनबंदी असल्याने तेथील ग्रामस्थांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब शेळके यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान पर्यटनबंदी मागे घेण्यात आली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन पर्यटक तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन करावे. पर्यटक तसेच ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.