ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक ट्विट; मुंबईतील बत्तीगुल होण्यामागे घातपाताची शक्यता


मुंबई – सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाले होते. पण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे धक्कादायक ट्विट केले आहे.


महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. पण सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीज गेल्याचे सांगितले होते. पण ऊर्जामंत्र्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली आहे. सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.