आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अमित देशमुख नाराज


जालना – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली दिली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी वक्तव्य केल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. एका समितीची सदोष पीसीआर किट्स प्रकरणी स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटल्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील २ नेत्यांच्या मतात तफावत असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या १२ लाख ५० हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. पण वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या सर्व किट्स खरेदी केल्याचे म्हणत टोपेंनी हात झटकले होते. त्यावर अमित देशमुखांनी आज नाराजी व्यक्त केली आहे. खोलवर माहिती न घेता टोपेंनी हे वक्तव्य केल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली दिली होती. आरटी पीसीआरच्या तब्बल १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. GCC Biotech Ltd कंपनीच्या राज्य सरकारने खरेदी केलेल्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचे त्यांनी म्हटले होते. या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. आरोग्यमंत्र्यांनी सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले होते. त्याचबरोबर GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.