दुसऱ्यांदा करोना संसर्ग होऊन मृत्यूची जगातली पहिली केस

करोना एकदा झाला की रुग्णाच्या शरीरात प्रतीपिंडे तयार होतात आणि त्यामुळे समजा दुसऱ्यांदा संसर्ग झाला तरी तो तितका प्रभावी नसतो आणि या रूग्णांपासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ शकत नाही असे सांगितले जात असताना एका डच महिलेला करोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होऊन त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जगातील या प्रकारची ही पहिलीच केस ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला ८९ वर्षांची होती. तिला रक्ताचा कर्करोग होता आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरु होते. त्या काळात दोन महिन्यात तिला दोन वेळा करोना संसर्ग झाला आणि विशेष म्हणजे हे करोना विषाणू वेगळ्या स्ट्रेनचे होते. पहिल्या वेळी या महिलेची करोना चाचणी पोझिटिव्ह आली पण त्यातून पूर्ण बरी झाल्यावर तिला घरी सोडले गेले. नंतर ५९ दिवसांनी तिला पुन्हा पहिल्यासारखी लक्षणे दिसू लागली तेव्हा तिची पुन्हा चाचणी केली गेली तेव्हा तिला करोना संसर्ग झाला असल्याचे व या विषाणूचा स्ट्रेन वेगळा असल्याचे दिसून आले. त्यात तीन आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला.

या महिलेच्या मृत्यूचा अहवाल लिहिणाऱ्या डॉक्टरने तिचा मृत्यू कर्करोगामुळे नाही तर करोना मुळेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. केमो थेरपी सुरु असलेले रुग्ण करोना साठी हाय रिस्क मानले जातात. अमेरिकेत एका २५ वर्षीय युवकाला ४८ दिवसात दोन वेळा करोना संसर्ग झाल्याचे व हे विषाणू सुद्धा वेगळ्या स्ट्रेनचे असल्याचे दिसून आले आहे. मात्र पहिल्या संसर्गातून तो पूर्ण बरा झाल्यावर झालेला दुसरा संसर्ग अधिक तीव्र असल्याचेही दिसून आले असून या रुग्णाला ऑक्सिजन वर ठेवले गेले आहे.