देव कुलुपबंद का? पश्न विचारतानाच भाजपला पडला सोशल डिस्टन्सिंगचा विसर


मुंबई – राज्याताली मंदिरे उघडण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून त्यातच आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर जे आंदोलन झाले त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा सपशेल फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला. भाजपच्या आंदोलकांनी यावेळी बार आणि रेस्टॉरंट उघडले गेले मग धार्मिक स्थळे बंद का? असा प्रश्न विचारला. मंदिरे, मशिदी, चर्च सगळे कोरोना आणि लॉकडाउनमुळे बंद आहे. सर्व काही गोष्टी अनलॉकमध्ये सुरु होत आहेत. अशात मंदिर प्रवेशालाही परवानगी द्यावी अशी मागणी करत भाजपने आंदोलन केले. पण सोशल डिस्टन्सिंगचा या आंदोलनात पूर्ण फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला.


हे आंदोलन भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी हातात गणपती बाप्पाची मूर्ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणली होती. या मूर्तीची आरती करण्यात आली आणि भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. परिसरात काही वेळासाठी वातावरण तणावाचेही झाले होते.


दरम्यान बार आणि रेस्टॉरंट सुरु करणाऱ्या ठाकरे सरकारला धार्मिक स्थळे बंद ठेवताना का लाज वाटत नाही ? असाही प्रश्न या आंदोलकांनी विचारला. फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काहीशी झटापटही झाली. या संपूर्ण आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे पाहण्यास मिळाले.


एका वेळी दोन वक्तव्ये मुख्यमंत्री करतात. आधी सांगायचे तुम्ही खबरादारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो. आता माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जनतेवर जबाबदारी का टाकत आहात? तुम्ही सक्षम नाही म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणता. तुमची घोषणा माझे सरकार माझी जबाबदारी का नाही? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला.