आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच किम जोंग-उनने मागितली जनतेची माफी


प्याँगप्यांग – आपल्या क्रौर्य आणि निष्ठूरपणासाठी ओळखला जाणारा जगभरात ओळखला जाणार उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पहिल्यांदाच पाणवलेल्या डोळ्यांनी केलेल्या अपयशाबद्दल देशातील जनतेची माफी मागितली आहे. एका लष्करी परेडमधील भाषणादरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग खूप भावनिक झाला आणि यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. देशासाठी बलिदान दिल्याबद्दल त्याने सैनिकांचे आभार मानले. तसेच लोकांचे जीवन सुधारण्यास अपयशी ठरल्याबद्दल उत्तर कोरियामधील नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली.

यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना किम जोंग उन यांनी विनाशकारी वादळ आणि कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल सैन्यदलाचे आभार मानले. राज्य टेलिव्हिजन स्टेशनने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये किम जोंगच्या डोळ्यांत अश्रू फुटल्याचे दिसून आले. सर्वांसमोर भाषणादरम्यान ते अश्रू पुसताना देखील दिसले.

किम जोंग उन कार्यक्रमास संबोधित करताना म्हणाले की उत्तर कोरियातील एकालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तथापि, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दाव्यावर संशयी आहेत. किम पुढे म्हणाले की कोरोनाविरोधी उपाय, आंतरराष्ट्रीय बंदी आणि अनेक वादळांचा परिणाम यामुळे नागरिकांचे जीवन सुधारण्याचे आश्वासन पूर्ण करण्यापासून सरकारला रोखले आहे. किम जोंग उन पुढे म्हणाले की, माझे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा आपल्या लोकांना त्यांच्या जीवनातील अडचणींपासून मुक्त करण्यासाठी पुरेसे नाहीत. तथापि, काहीही असो, आपल्या लोकांनी नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आणि माझ्या दृढनिश्चयाचे समर्थन केले आहे.

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर लादलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे आधीच गंभीर परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नात, देशाने जवळपास सर्व सीमा वाहतूक बंद केल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ढासळली आहे.