आयसीसी अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली प्रबळ दावेदार

यंदाच्या आयसीसी अध्यक्षपदासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने सोमवारी पुढच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली असून ती डिसेंबरच्या सुरवातीस संपणार आहे. या निवडणूक कामकाजावर आयसीसीचे ऑडीट समितीचे स्वतंत्र अध्यक्ष देखरेख करणार आहेत.

या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नामांकने होतील व त्याची मुदत १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. त्यात संचालक मंडळातील माजी अथवा आजी सदस्य संभावित उमेदवार असतील. भारताचे शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा जुलै २०२० मध्ये राजीनामा दिला असून तेव्हापासून हे पद रिकामे आहे. सध्या सिंगापूरचे इम्रान ख्वाजा आयसीसीचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि इंग्लिश आणि वेल्श क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष कोलीन ग्रॅटस हे या पदाचे भावी उमेदवार आहेत. त्यात सौरव गांगुलीचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.