फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी करायला हवे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत – संजय राऊत


मुंबई: आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे रक्षण केले असून ते एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी स्वागत केले पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आरे परिसरातील मेट्रो-३ प्रकल्पाची नियोजित कारशेड राज्य सरकारने कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी मंगळवारी या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला टोला लगावला. पर्यावरण रक्षणाची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी करतात. गंगा शुद्धीकरण, सेव्ह टायगर आणि जंगल वाचवण्यासाठीचे इतर उपक्रम त्यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगल वाचवून एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला आहे. आरेतील जंगलाचे क्षेत्र 600 एकरावरुन 800 एकरापर्यंत उद्धव ठाकरे यांनी वाढवल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आरेची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर भाजपकडून प्रकल्पाचा खर्च आणि व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. कारशेड कांजूरला हलवल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड मोठी वाढ होईल. तसेच प्रकल्प पूर्ण होण्यास विलंबही लागेल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढण्याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी बिहारमधील शिवसेना स्थानिक पक्षांशी युती करुन निवडणूक लढवण्याला प्राधान्य देईल. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच मी पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना निवडणूक लढवत आहे का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. पण शिवसेनेची बिहारमध्ये तेवढी ताकद नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. परंतु, शिवसेना ४० ते ५० जागांवर निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.