चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांचा बाप काढला


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर टीका करताना दुसऱ्यांदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून बापाचा उल्लेख करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप असल्याचे म्हटले होते. तर काल भाजपतर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत एका ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी आणि ही विधेयके शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत हे सांगण्यासाठी करण्यात आले होते.

या रॅलीत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. शेकडो ट्रॅक्टरची रांग या रॅलीसाठी पुणे-सोलापूर महामार्गावरती भाजपने लावली होती. चौफुला या ठिकाणी वरवंडहून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप झाला आणि तिथे या रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले.

समारोपच्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला राज्य सरकारने दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली. या विधेयकाला विरोध शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. या स्थगितीच्या विरोधात भाजप उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. पण ते एवढेवरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल, असे जाहीर केले. यांच्या बापाची पेंड आहे का असे, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आणि अजित पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.