मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका


मुंबई – मुंबईतील अनेक भागांमध्ये सोमवारी पॉवर ग्रीडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. मुंबईतील अनेक ठिकाणी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी खंडीत झाला. त्यानंतर आता मुंबईतील परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येत असली तरीही उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.


पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून आतापर्यंत जे कधी नाही झाले ते सगळे होत आहे. आता फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे बाकी आहेत…ते ही दिसतील असे म्हणत ठाकरे सरकारवर नितेश राणेंनी टीकेची झोड उठवली आहे.

मुंबईतील वीज पुरवठा खंडीत प्रकरणावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही टीका केली आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आले असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.