नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत


अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्य येत्या नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाचा मूळपासून नाश करणारी प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे पुढील काही दिवस आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाणार आहे. राज्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले. कोरोनाचा रोखथाम करणारी लस अद्याप आलेली नसल्यामुळे कोरोनासोबत आपल्याला जगावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

तसेच आरटी पीसीआर टेस्टची किंमत 800 रुपयांपर्यंत आणली असून केंद्र सरकारने याची किंमत साडे चार हजार रुपये ठरवली होती. पण ती आम्ही दोन टप्यात खाली आणली आहे. तसेच ती येत्या आठवड्यात आठशे रुपयांपर्यंत आणणारा असा सूतोवाच राजेश टोपे यांनी केला आहे. त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणल्याचे टोपे यांनी सांगितले.