‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरवर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची प्रतिक्रिया, अक्षयने मानले आभार


सध्याच्या घडीला अक्षय कुमारचा आगामी आणि बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर ट्रेंड करत आहे. आजवर मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारलेला अक्षय कुमार आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. तृतीयपंथीय लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि त्यांना चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.

आपल्या ट्विटर हॅंडलवर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्या सांगतात की, लक्ष्मी धमाका करण्यासाठी येत आहे. हे ऐकून फार चांगले वाटते की, माझेही नाव लक्ष्मी आहे. नुकताच हा ट्रेलर पाहिला. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरची वाट मी बघत होते. आज ट्रेलर बघून माइंड रिफ्रेश झाले. अक्षय कुमारजी आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देते, ज्यांनी इतका सुंदर चित्रपट तयार केला आणि ट्रेलरही. हा चित्रपट किती चांगला असेल हे आताच समजून येते आहे. थॅंक्यू’.


अक्षय कुमारने लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, आमच्यासाठी हे फार महत्वाचे आहे. एवढे प्रेम देण्यासाठी खूप आभार. एका लक्ष्मीकडून दुसऱ्या लक्ष्मीला धन्यवाद! नाव खरंच खूप खास आहे.