गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर बोचरी टीका


मुंबई – गेल्या ५० वर्षांपासून देशासह राज्याचे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात मी सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी जर खाली उतरून मतदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सल्ले देत बसू नसल्याचे म्हणत म्हणत रोहित पवारांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला. पडळकर यांनी रोहित पवारांवर कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून निशाणा साधला. यासंदर्भातील एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.


गेल्या पन्नास वर्षापासून देशासह राज्याचे नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार या मतदारसंघाचे आमदार आहेत. आज औरंगाबादला मी दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. टीव्हीवर, ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रोहित पवार हे सतत सल्ले देत असतात. त्यांची उंची फार वाढल्या सारखी त्यांना वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, ते त्यांची उंची शरद पवारांच्या खांद्यावर बसून मोजतात. शरद पवारांच्या खांद्यावरून रोहित पवार तुम्ही खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

साधा गावातील तुम्हाला रस्ता करता येत नसेल आणि देशाच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा हे रस्ते कर्जत मतदारसंघातील आहेत, त्यावरून प्रचंड रहदारी आहे आणि लोकांचे प्रश्न जाणून घेणे गरजेचही आहे. तुमचे सरकार राज्यात आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील येत्या काही दिवसात रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो, असेही ते म्हणाले.