छत्रपती संभाजीराजेंकडून वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्याचा गौप्यस्फोट


मुंबई – मराठा आरक्षणाचा विषयावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविषयी छत्रपती संभाजीराजे यांनी गौप्यस्फोट केला आहे. एका बैठकीदरम्यान मी आणि वडेट्टीवार एकत्र होतो. ऑफ द रेकॉर्ड ते मला एक गोष्ट म्हणाले. ती आता ऑन रेकॉर्ड आणायला काही हरकत नाही.

मराठा समाजाप्रती त्यांचे मोठे मनही असू शकेल. मराठा समाजाला आमचा विरोध नाही उलट तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही? जसा अ, ब, क, ड असे प्रवर्ग आहेत, तसा आणखी एक वर्ग वाढवू आणि तुम्ही वाढीव आरक्षण घ्या, असे वडेट्टीवार आपल्याला म्हणाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजेंनी हा गौप्यस्फोट एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. जर आपण खोटे बोलत असू तर त्यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा मी वंशज आहे. त्या नात्याने मी सांगतो की ही त्यांची वक्तव्य असल्याचे ते म्हणाले.

वडेट्टीवार तुम्ही जे बोलला ते तुमचे मोठे मन आहे. पण आपण अद्यापही सामाजिक मागास आहोत हे सिद्ध झाले आहे. एसईबीसी असे आपले आरक्षण हे आहे आणि आपण त्यावरच लक्ष देऊ, असे मी त्यांना त्यावेळी सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले. त्याचबरोबर जातीय विषमता वाढू नये. त्यांची बाजूही बरोबर असू शकते, असेही संभाजीराजेंनी नमूद केले.