निवडणुकीसाठी चरित्र प्रमाणपत्र आणायला गेलेला नेता चतुर्भुज

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाकडून निवडणुकीचे तिकीट अपेक्षित असणारे नेते चंद्रहास चौपाल यांना अनपेक्षित अडचणीस सामोरे जाण्याची वेळ आली. चरित्र प्रमाणपत्र आणण्यासाठी चौपाल पोलीस ठाण्यावर गेले तेव्हा त्यांना अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी पोलीस चौकीच्या आवारातच अटक केली असल्याचे समजते.

चौपाल मधेपुरा मधील सिंहेश्वर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दलाने यंदा इच्छुक उमेदवारांना चरित्र प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले आहे. त्यानुसार चौपाल पोलीस ठाण्यावर गेले होते. ते शंकरपूरचे रहिवासी आहेत पण मधेपुरा मधून निवडणूक लढवू इच्छित आहेत. शंकरपूर येथील एका युवकाचे अपहरण आणि हत्या प्रकरणात चौपाल संशयित आहेत. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. गुरुवारी चौपाल चरित्र प्रमाणपत्र आणण्यासाठी मधेपुरा पोलीस चौकीत गेले तेव्हा त्यांना याच आरोपावरून अटक झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौपाल यांच्यावर अटक वॉरन्ट जारी झालेले होते.

चौपाल यांनी मात्र त्यांच्यावर केले गेलेले आरोप खोटे असल्याचे व या घटनेशी त्यांचा दुरूनही संबंध नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना फसविले गेले आहे.