पालकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करणार; बच्चू कडूंचे शालिनी ठाकरेंना आश्वासन


मुंबई : कोरोना संकटकाळात शाळा व्यवस्थापन जर पालकांचे आर्थिक शोषण करत असतील, तर त्यांना जाब विचारून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे यांना दिले. बिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांच्या पालकांसोबत शालिनी ठाकरे यांनी कडू यांची मंत्रालयात भेट घेतली आणि पालकांच्या समस्यांचा पाढा वाचला.

मुंबईसह राज्यभरातील अनेक शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या आयसीएसई/ सीबीएसई/ इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांच्या व्यवस्थापनांकडून पालकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत. कोरोना संकटकाळ असतानाही शाळा व्यवस्थापनांनी शाळा फीमध्ये वाढ केली असून ही फी भरणे पालकांना अशक्य होत आहे. यासंदर्भात ठिकठिकाणच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनांशी चर्चा करण्याचा, संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र शाळा व्यवस्थापनांनी पालकांच्या समस्यांना गांभीर्याने घेतलेले नाही, असे मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

फी वाढ आणि वापरात नसलेल्या सुविधांशी संबंधित शुल्क, डिजिटल शिक्षणाचा दैनंदिन कालावधी आणि गुणवत्ता, तसेच शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याची अंमलबजावणी यासंदर्भातील चौकशी अहवाल मागवण्यासाठी आणि दोषी शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाईसाठी विशेष अधिका-यांची किंवा विशेष समितीची नेमणूक करावी व अडचणीत सापडलेल्या पालकांना ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे केली.