ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन


गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे राहत्या घरी निधन झाले. चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये अविनाश खर्शीकर यांनी काम केले असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती.

‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून अविनाश खर्शीकर यांनी मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांच्या अभिनयाची जादू केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटके तर प्रचंड गाजली. दरम्यान, काही मालिकांमध्येही अविनाश खर्शीकर यांनी काम केले होते. लोकप्रिय ‘दामिनी’ या मालिकेत ते झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.