एका बिनडोक राजाला राज्यसभेत कसे पाठवले याचेच आश्रर्य; प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर नाव न घेता टीकास्त्र


पुणे – वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याची घोषणा पुण्यात अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा करतानाच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबेडकर उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत एक राजा बिनडोक असल्याचे म्हणाले.

नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तीव्र होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या वतीने १० ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असून, प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीने या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला याची माहिती दिली. दोन्ही राजाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्या प्रश्नावर भूमिका मांडली.

दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण आरक्षणापेक्षा ते इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे मला दिसत आहे. राज्य घटना ज्या माणसाला माहिती नाही. आरक्षण आम्हाला मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका ते मांडतात. भाजपने त्यावरून राज्यसभेवर कसे पाठवले? असा प्रश्न पडत असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. कोणालाही अंगावर घेण्यास मी घाबरत नसल्याचेही ते म्हणाले.

आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षण समितीमधील सुरेश पाटील यांनी काल मला फोन करून, १० तारखेच्या मोर्चा आणि बंदला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. त्या मागणीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच मराठा आरक्षण हे वेगळे असून, ओबीसी समाजाचे देखील आरक्षण वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या राहतील, हे लक्षात घेऊन, ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी होणार नाही. सुरेश पाटील यांनी याबाबतची दक्षता घ्यावी, असे आंबेडकर म्हणाले. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कुठे तरी सामंजस्य बिघडताना दिसत आहे. त्यावर मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन्ही पक्ष ठामपणे राहिल्यास, राज्यातील सामंजस्य आणि शांततेचे वातावरण निश्चित राहिल, असे आंबेडकर म्हणाले.