एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा जे परिणाम होतील त्याला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे


मुंबई : राज्यभरात रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.

संभाजीराजे याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबांधितांची वाढती संख्या अद्यापही नियंत्रणात येते नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणे म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. 200 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे.

जर कुठल्या विद्यार्थ्यांला यामध्ये कोरोनाची लागण झाली तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का? ही परीक्षा जर झाली तर मराठा समाजातील कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन परीक्षा केंद्र फोडून टाकतील. 2 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आज प्रश्न असताना देखील सरकार परीक्षा घेत असेल तर यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना याची देखील शक्यता नाकारता येत नाही. हे षडयंत्र आम्ही होऊ देखील देणार नाही.

राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक नवी मुंबईतील माथाडी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. खासदार छत्रपती संभाजीराजे त्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी ही भूमिका मांडली. राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी मागणी देखील सरकारकडे केली.