ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी पासवान यांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना


नवी दिल्ली – गुरुवारी रात्री बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदींनी राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना व्यक्त केल्या आहेत.


आज मला प्रचंड दु:ख झाले आहे. ते बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आज आपल्या देशात पोकळी निर्माण झाली आहे. ती कदाचित कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


रामविलास पासवान यांची बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून ओळख होती. आपल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केले होते.