असा होता बिहारच्या राजकारणातील वजनदार नेत्याचा राजकीय प्रवास


पाटना – गुरुवारी रात्री बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे निधन झाले. पासवान यांच्यावर गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर नुकतीच हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. अशाच या नेत्याचा असा होता राजकीय प्रवास

आठवेळा लोकसभेवर बिहारचे राम विलास पासवान यांनी प्रतिनिधीत्व केले. ते सध्या राज्यसभेतून खासदार होते.

त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षातून राजकारणाचे धडे गिरवले. ते १९६९ साली पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले.

त्यांनी लोक दलमध्ये १९७४ साली प्रवेश केला आणि सरचिटणीस बनले.

त्यांनी १९७५ मध्ये आणीबाणीला विरोध केला. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले.

जनता पार्टीच्या तिकिटावर १९७७ साली त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.

त्यानंतर त्यांनी १९८०, १९८९, १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये लोकसभेमध्ये बिहारचे प्रतिनिधीत्व केले.

राम विलास पासवान यांनी २००० साली लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली.

त्यांनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये २००४ साली प्रवेश केला. त्यावेळी ते रसायन आणि खत मंत्री होते.

राम विलास पासवान यांनी २००४ साली लोकसभेची निवडणूक जिंकली पण २००९ साली ते पराभूत झाले.

ते २०१० साली पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यांनी २०१४ मध्ये हाजीपूरमधून पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली.

ते २०१४ पासून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होते. मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.