ग्रंथालयाच्या प्रतिनिधींच्या भेटीनंतर राज ठाकरे यांना उदय सामंत यांचे दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून केंद्र तसेच राज्य सरकारकडून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सरकारने अद्यापही ग्रंथालंय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यापार्श्वभूमीवर ग्रंथालय प्रतिनिधींनी राज्यातील ग्रंथालये सुरू करावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज ठाकरे यांच्याकडे ग्रंथालयाच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी त्वरित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच चर्चेदरम्यान लवकरात लवकर राज्यातील ग्रंथालयंदेखील सुरू करण्यात येतील आणि दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी राज ठाकरे यांना दिले.

ऊर्जा आणि वैचारिक आनंदही पुस्तकांमुळे मिळतो. त्याची सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात नितांत आवश्यकता आहे. लॉकडाउनमध्ये बंद करण्यात आलेली ग्रंथालये पुन्हा सुरू करावी. तसेच राज ठाकरेंसमोर यावर अंवलंबून असलेल्या अर्थचक्राला गती मिळेल, असे म्हणणे प्रतिनिधींनी मांडले. यापूर्वी हॉटेल चालक, मुंबईचे डबेवाले, डॉक्टर्स, जिमचे चालक, कोळी महिला हे देखील आपल्या मागण्यांसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.