करोना काळातील बाळजन्मासाठी  हा देश देणार बोनस

फोटो साभार बीबीसी

पर्यटकांचा स्वर्ग अशी लोकप्रियता असलेल्या सिंगापूर मध्ये जगात सर्वात कमी जन्मदर आहे. त्यातच करोना मुळे आलेल्या आर्थिक मंदीचा विचार करून अनेक जोडप्यांनी त्यांचे बाळ जन्माला घालण्याची योजना स्थगित केल्याचे दिसून आल्यावर सिंगापूर सरकारने अश्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस देण्याची योजना जाहीर केली आहे.

करोनाची दहशत सर्व जगाला व्यापून राहिली असताना नागरिक कोणत्याही कारणाने हॉस्पिटल मध्ये जावे लागू नये याबाबत सतर्क झाले आहेत. त्यामुळे सिंगापूर मधील जोडप्यांनी बाळ जन्माला घालण्याची योजना सुद्धा पुढे ढकलली आहे. मात्र आता सरकारने पुढाकार घेऊन जोडपी बाळ जन्माला घालण्याची योजना सहज आखू शकतात असा दिलासा देताना असा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांना बोनस दिला जाईल असे जाहीर केल्याची बातमी सीएनएन ने दिली आहे.

या बातमीनुसार सिंगापूरचे उपपंतप्रधान हेंग स्वे केट यांनी आगामी काळात जन्माला येणाऱ्या मुलांच्या मातांना बाळंतपण बोनस दिला जाईल असे सांगितले आहे. हा बोनस किती असेल याचा खुलासा केला गेलेला नाही मात्र तो १ हजार डॉलर्स असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

सिंगापूर मध्ये करोना संक्रमण खुपच कमी प्रमाणात झाले आहे. करोना बाधितांची संख्या ५७ हजार असून करोनाने २७ जणांचा बळी घेतला आहे. जगात सर्वात कमी करोना मृत्यूदर असलेला देश म्हणून सिंगापूर ची नोंद झाली आहे.