एकनाथ खडसेंसोबतच्या आजच्या भेटीवर शरद पवारांनी केला खुलासा


मुंबई : सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या आजच्या भेटीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर काल खडसे मुंबईत दाखल झाल्यामुळे खडसे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार अशी चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरबाहेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या भेटीबाबत भाष्य केले. आज आपल्यासोबत एकनाथ खडसे यांची भेट होणार असा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आले नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट होणार नसल्याचा खुलासा शरद पवार यांनी केला.